Login

"काय माझा गुन्हा...?" भाग ४८

सामाजिक
दिर्घ कथा लेखन स्पर्धा...
डिसेंबर व जानेवारी...२०२५-२०२६


"काय माझा गुन्हा...?" भाग ४८


मुंबई... आता वेगळी होती…
कारण... ती त्यांची परीक्षा घेणार होती…

मुंबईला येताना
रेल्वेच्या खिडकीतून बाहेर पाहत
गौरवी शांत बसली होती... आणि माधवच्या खांद्यावर विसावली होती…
मनात हजार प्रश्न… पण चेहऱ्यावर संयमाची एक पातळ शांत रेघ होती…

रेल्वे वेगाने पुढे धावत होती… खिडकीबाहेर बदलत जाणारी दृश्यं जणू त्यांच्या आयुष्याच्या वळणांसारखीच भासत होती…

माधवच्या खांद्यावर विसावलेली गौरवी डोळे मिटून बसली होती… झोप आली नव्हती… पण मन मात्र थकलेलं होतं…

प्रत्येक स्टेशन येत होतं… थांबत होतं… आणि मागे पडत होतं…
जसं त्यांच्या आयुष्यातले काही क्षण…

माधवने बाथरूमला जायचं असं सांगून... तो ट्रेनच्या दरवाजाजवळ आला... आणि मन घट्ट करत... एक घट्ट श्वास घेतला... आणि घरी फोन लावला…
“आई… मी मुंबईला येतोय…”
क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला...
“आणि… मी लग्न केलं आहे…”

फोनपलीकडे एकदम शांतता पसरते…

तो शब्द माधवच्या आईपर्यंत पोहोचायला काही क्षण घेत होता…
“कोण आहे ती…?”
थंड, आणि कोरडा प्रश्न माधवची आई विचारते…

“गौरवी… तीच ती... जिच्यावर माझं प्रेम आहे... आणि मी कोर्टात रजिस्टर लग्न केलं आहे…”
माधव स्पष्ट बोलला…

त्या क्षणी कुठलाही वाद झाला नाही… कुठलीही ओरडाओरड झाली नव्हती…
पण त्या शांततेत एक कठोर नकार मात्र दडलेला होता…

माधव गौरवीच्या बाजूला येऊन बसतो... आणि हळूच तिच्या केसांवरून हात फिरवतो…
“घाबरलीयस का…?” तो अलगद विचारतो…

गौरवी डोळे उघडते…
क्षणभर खिडकीबाहेर पाहते…
आणि मग शांतपणे म्हणते…
“घाबरली आहे… पण तुझ्या शेजारी आहे… म्हणून मजबूत आहे…”

माधव तिच्या हातात आपला हात घट्ट गुंफतो…
“मुंबई कठीण आहे…”
तो म्हणतो…
“पण आपण त्याहून कठीण झालोय…”

गौरवी हलकंसं हसते…
“आधी मुंबई आपल्याला दूर घेऊन गेली होती…”
ती म्हणते…
“आता तीच आपल्याला एकत्र उभं राहायला शिकवणार आहे…”

रेल्वेने एक मोठा पूल ओलांडला…
पाण्यावर पडलेली शहराची सावली दिसू लागली…

मुंबई जवळ येत होती… पण यावेळी
ती शहर नव्हती… ती एक परीक्षा होती…
आणि गौरवी – माधव ती एकत्र देणार होते…

ट्रेन हळूहळू प्लॅटफॉर्मवर येऊन थांबली…
ब्रेकचा आवाज… लोकांची घाई… हमालांचे हाकारे…
आणि त्या गोंगाटातही माधव आणि गौरवी एकमेकांचा हात घट्ट धरून उभे होते…

दोघेही ट्रेनमधून उतरतात… मुंबईचा तो दमट वारा अंगावर येतो… तोच वास… तोच गोंगाट… पण यावेळी परिस्थिती वेगळी होती…

गौरवीने आजूबाजूला एक नजर टाकली…
मनात थोडीशी धडधड होती…
पण माधव जवळ असल्याने ती धडधड भीतीतून पुन्हा आत्मविश्वास परावर्तित झाली...



क्रमशः....

©® प्राची कांबळे (मिनू)


"सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही."


0

🎭 Series Post

View all